काव्यविश्वातल्या दीपस्तंभाचं चरित्र
देशात उर्दूचा जन्म होऊन ती स्थिरावली, लोकभाषा झाली तेव्हा या देशाच्या आत्म्याला एक मधूर नाद मिळाला, असं म्हटलं जातं. उर्दू ही अदबशीर, नाजूक आणि नादमय भाषा आहे. या भाषेत शिव्याशाप घालणाराही अशा नजाकतीनं ते घालतो, जे ऐकण्या-याच्या कानांना तृप्तीचं अवर्णनीय समाधान देतात. आपण केलेल्या आगळीकीसाठी आपल्याला असं काही ऐकवलं जाणार असेल तर पश्चात्ताप वगैरे तर सोडाच पण आपण पुन्हा पुन्हा अगणित वेळा, अगणित आगळीकी करतच राहू, अशी भावना निर्माण व्हावी. उर्दू ही जशी प्रेमाची भाषा आहे तशीच ती क्रांतीचीही भाषा आहे. ‘इन्किलाब झिंदाबाद’ची ज्वलंत घोषणा भगतसिंगानं याच भाषेत दिली होती. प्रेमभंगाच्या अगणित व्याकुळ करणाऱ्या काव्यरचनांसहच रक्त सळसळवणारी अनेक क्रांतीगीतंही या लोकभाषेत लिहिली गेली. उर्दू भाषा लिहिता-वाचता-बोलता येणं, हे या देशात एकेकाळी श्रीमंतीचं आणि खानदानीपणाचं लक्षण समजलं जाई. उर्दूनं अनेक शायर केवळ या देशालाच नव्हे तर जागतिक साहित्यवर्तुळाला दिले. त्यांच्यापैकीच एक शिखरस्थ नाव म्हणजे फ़ैज़ अहमद फ़ैज़.
उर्दू भाषेत फ़ैज़ या शब्दाला, मुबलक, खूप, पुष्कळ, अमाप, सफल, विजेता, अनुग्रह, लाभ, अशा अनेक अर्थच्छटा आहेत. थोडक्यात समृद्धीदर्शक असा हा शब्द/नाव आहे. फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांनी आपल्या आयुष्यात जी वैविध्यपूर्ण काव्यरचना केली, ती पहाता आपलं नाव त्यांनी सार्थ ठरवलं, असंच म्हणता येतं. प्रिती आणि क्रांती यांच्यातला साकव/पूल असलेल्या फ़ैज़ यांचा शेर दुरूनही ओळखता येतो. शेरोशायरी, उर्दू-हिंदी साहित्यातल्या पंडितांनाच नव्हे तर अगदी कवितेच्या निव्वळ रसिक असलेल्या आणि साहित्याबद्दल थोडीबहुत जाण असलेल्या व्यक्तिलादेखील तो लगेचच कळतो! ‘हम देखेंगे’, ‘बोल के लब आज़ाद है तेरे’, ‘आए कुछ अब्र’, ‘मुझसे पहली सी मुहब्बत मेरे महबूब न माँग’, ‘आज बाज़ार में पा-ब-जौलाँ चलो’, ‘ग़म की शाम’, ‘ग़ुलो में रंग भरे’ – या रचना आपण सतत, विविध निमित्तानं ऐकल्या आहेत. तरूणांपासून ते बुजुर्गांपर्यंत प्रत्येकाला आपल्या भाषेत लिहिणारा शायर म्हणून फ़ैज़ परिचित आहे. तरूणांना त्यांची भाषा आणि सेन्सिबिलीटी आपली वाटते, विविध मागण्यांसाठी, न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरणारे आंदोलक फ़ैज़ गातात आणि आपला आवाज बुलंद करतात, बुजुर्गांना आपल्या मुद्द्याचा खुंटा बळकट करायचा असेल तर ते जातात फ़ैज़च्याच आस-याला आणि सर्वसामान्य माणसाच्या उदासपणाला, व्याकुळतेला वाणी देतो तो फ़ैज़च. सर्व स्तर-वर्गातील, वयोगटातील लोकांना फ़ैज़ आपला वाटतो. अशी स्वीकारार्हता आणि लोकप्रियता क्वचितच कुणाला लाभत असते. फ़ैज़ हा काही हस्तिदंती मनो-यातला कवी नव्हता. आयुष्य आसुसून भोगलेला माणूस होता. सत्तेविरोधात सरळसरळ थेटपणे भूमिका घेणारा कवी होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या शब्दनशब्दाची जबाबदारी घेणारा निर्भय साहित्यिक होता. त्या सगळ्याची पुरेपूर किंमतही त्यानं आयुष्यभर चुकवली. त्याचं जगणं आणि लेखन वेगवेगळं नव्हतंच मुळी. ‘जिंदगी का निचोड़’ त्याच्या शब्दाशब्दांतून प्रपातासारखा कोसळत रहातो.
फ़ैज़चं हे विलक्षण आयुष्य त्यांचाच नातू अली मदिह हाश्मी यांनी इंग्रजीत शब्दबद्ध केलं. त्याचं मराठी भाषांतर ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार शेखर देशमुख यांनी केलं आहे. ‘लव्ह अँड रेव्होल्यूशन फ़ैज़ अहमद फ़ैज़: अधिकृत चरित्र‘ या शीर्षकाचं हे पुस्तक लोकवाङ्मय प्रकाशन गृहानं ऑगस्ट महिन्यात प्रकाशित केलं. छायाचित्रांसह असलेल्या चारशे पृष्ठांत फ़ैज़ नावाच्या कार्यकर्त्या कवीचं सांगोपांग जगणं वाचकासमोर उलगडत जातं. एका लोकोत्तर आणि प्रचंड लौकिक यश मिळालेल्या कवीचं अधिकृत चरित्र लिहिणं ही काही सोपी गोष्ट खचितच नव्हे. मुळात चरित्रलेखन ही सोपी गोष्टच नाही. बऱ्याचदा आत्मचरित्र ही जशी आत्मसमर्थनं होत जातात तशीच चरित्रं भलामणं होत जातात. नायकाची प्रतिमा विशाल करण्याच्या नादात इतरांना अर्कचित्रात्मक रंगवलं जातं आणि मुळात नसलेले खलनायक जन्माला घातले जातात. फ़ैज़सारख्यांच्या बाबतीत हे घडण्याची शक्यता अधिक. सदासर्वकाळ सार्वजनिक जीवनात रमणाऱ्या माणसाचं आयुष्य मनुष्यश्रीमंत असतं. इथं बरी-वाईट दोन्ही प्रकारची माणसं मुबलक. पण अली मदिह हाश्मी यांनी चरित्र मेलोड्रॅमॅटिक करण्याचं शिताफीनं आणि काळजीपूर्वक टाळलं आहे. आजोबांचं चरित्र लिहिताना ते वास्तवदर्शी आणि सत्याशी प्रामाणिक राहून लिहिलं आहे. विशेषत: भारत-पाकिस्तान फाळणीचे दिवस, फ़ैज़ यांना भोगावा लागलेला दमनकाळ यांबद्दल अतिशय संयतपणे आणि ‘जे घडलं तसं’ सांगितलं आहे. कुणी धवल नाही अन् कुणी काळबेरं नाही.
अली मदिह हाश्मी यांना आपल्या आजोबांचा प्रदीर्घ सहवास लाभला. त्या दोघांत घट्ट मैत्र होतं. नातवाच्या तोंडून जणू आजोबाच आपल्या जिंदगीची दास्तान आपल्याला ऐकवताहेत, असं हे ओघवतं आणि वेगवान लेखन आहे. त्याची अचूक लय शेखर देशमुख यांनी मराठी भाषांतरातही राखली आहे.
या भाषांतराची सर्वांत जमेची बाजू म्हणजे फ़ैज़ यांच्या मूळ काव्यरचनांचं मराठी वृत्तबद्ध कवितांत टाळलेलं भाषांतर. जिथे जिथे मूळ उर्दू-पर्शियन काव्यरचना आहेत, त्या तशाच ठेवून कंसात त्याचा गद्य भावार्थ लिहिलेला आहे. त्यामुळे मूळ रचनांचं सौंदर्य पातळ होत नाही आणि त्याचा मतितार्थही सुस्पष्टपणे कळतो. काय भाषांतरीत करायचं आणि काय नाही, याचं भाषांतरकाराला जे पक्कं भान असावं लागतं, ते देशमुखांकडे आहे. फ़ैज़वरच्या निखळ प्रेमापोटी आणि त्यांच्या विचारांशी, कवितांशी आपली नाळ जोडली गेल्यानं त्यांना हे पुस्तक मराठी आणण्याची निकड वाटली. भाषांतरात सहजता आणण्यासाठी भाषांतरकारांनी प्रचंड कष्ट उपसले, विविध संदर्भ शोधले. फ़ैज़चंच झपाटलेपण घेऊन काम केलं.
शिवाय हे काही फक्त फ़ैज़ नावाच्या एका कवीचंच चरित्र नाही तर हा एका प्रचंड धगधगत्या ऐतिहासिक काळाचा दस्तऐवज आहे. फ़ैज़ वाचताना आपण हा काळही वाचत जातो, यादृष्टीनेही हे पुस्तक महत्वाचं आहे.
सदर पुस्तकामुळे फ़ैज़ यांच्याबद्दलचे अनेक गैरसमज वा त्यांची विविध माध्यमांतून जी चुकीची अर्थनिर्णयनं करण्यात आलेली आहेत, त्यांना बसणारा आळा, ही एक महत्वाची उपलब्धी म्हणता येईल. ‘पाकिस्तानी’ साहित्यविश्वात रमणारे, मंटोविरोधात साक्ष देणारे वगैरे जे आळ फ़ैज़ यांच्यावर लावण्यात येतात, त्याचं निराकरण हे पुस्तक करतं. भारत-पाकिस्तानचा सांधा आपल्या योगदानातून बळकट करणारी जी सृजनशील मंडळी होती त्यांच्यापैकीच एक फ़ैज़ होते. फाळणीनंतर पाकवासी होण्यामागे जी कारणं होती, तीदेखील या चरित्रातून वाचकाला कळतात. मुळात ते सियालकोटचेच होते. सियालकोट फाळणीनंतर पाकिस्तानात गेलं. आपल्या जन्मभूमीपासून त्यांना आपली नाळ तोडायची नव्हती. शिवाय ते पाकवासी झाले असले तरीही आयुष्यभर ते एक ‘जिप्सी’च राहिले. त्यांच्या पायाला चक्र होतं. सतत फिरतीवर असत. फाळणीनंतर त्यांनी अनेकदा भारत दौरे केले. भारताविषयी त्यांना आत्यंतिक ममत्व होतं. आयुष्याच्या एका टप्प्यावर तर सरदार पटेलांना भेटून काँग्रेस पक्षात प्रवेश करायची आणि आयुष्यभर काँग्रेसचं काम करण्याची त्यांनी तयारीही दाखवली होती. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू ते अटलबिहारी वाजपेयी- अशा व्यापक मैत्रीचा पट होता त्यांचा. अटलबिहारी वाजपेयी हिंदुत्ववादी असले तरी त्या दोघांच्या मैत्रीआड हा विरोध कधीच आला नाही.
सआदत हसन मंटो या आपल्या समकालीन लेखक मित्राबद्दलच्या असीम जिव्हाळ्याचे दाखलेही या चरित्रात आहेत. मंटोला त्यांनी वेळोवेळी केलेली निरपेक्ष मदत, त्याच्याबद्दलचा कळवळा याबद्दलचे प्रसंग हुरहूर लावणारे आहेत. फ़ैज़ना एकदाच मंटोला मदत करता आली नाही कारण त्यावेळी ते स्वत:च तुरूंगात होते, याबद्दलची कबुलीही इथे आवर्जून नोंदलेली आहे.
त्याशिवाय फक्त एक कवी म्हणूनच नव्हे तर फ़ैज़ यांच्या अन्य पैलूंचा वेधही हे चरित्र घेतं. त्यात रस्त्यावर उतरून कामगारांसाठी लढणारे फ़ैज़, संपादक फ़ैज़, मित्रांच्या वर्तुळातले फ़ैज़ ते कुटुंबप्रमुख फ़ैज़ याबद्दलही साद्यंत माहिती मिळते. आजवर पडदानशीन असलेला एक कवी ठसठशीतपणे वाचकांसमोर येतो. त्याच्या जगण्याच्या असोशी, काव्यातल्या रसरशीतपणाबद्दल इत्थंभूत माहिती मिळतेच पण मुख्य म्हणजे फ़ैज़ यांच्या साहित्याकडे वळण्याची इच्छा जागृत होते. दीपस्तंभ प्रकाशवाट दाखवतो, दिग्दर्शन करतो, फ़ैज़चं साहित्य असंच आहे. ते सर्वसामान्यांची भाषा बोलतं, ज्यांना आवाज नाही, त्यांचा आवाज होतं, दु:ख, यातनेचा काळ सरेल याची ग्वाही देतं आणि ठाम भूमिका घेण्याचं बळही देतं.
लोकवाङ्मय प्रकाशन गृहानं अत्यंत आत्मियतेनं मराठीत आणलेल्या चरित्राची निर्मितीमूल्यही श्रीमंत आहेत. विशेषत: मिलिंद कडणेंचं मुखपृष्ठ वाचकाला पुस्तकाकडे अक्षरश: खेचून घेतं. त्यांनी रेखाटलेलं फ़ैज़ची प्रतिमा अतिशय सजीव. शेखर देशमुखांनी व्रतस्थपणे केलेलं हे काम मराठी वाचकांना एका जागतिक कवीचा मूळातून आणि पुन:परिचय तर करून देईलच पण वर म्हटल्याप्रमाणे फ़ैज़च्या साहित्याकडे वळायला लावेल. पर्यायानं उर्दू भाषेकडेही वळायला लावेल. फ़ैज़ त्यांच्या मानगुटीवर बसला आहे. तो आपल्या सर्वांच्या मानगुटीवर बसेल. काही भूतं आयुष्यभर मानगुटीवर बसणं उपकारक असतं. त्यामुळे आपलं जगणं समृद्ध होतं.
सरतेशेवटी फ़ैज़ म्हणतो तसं –
और क्या देखने को बाक़ी है
आप से दिल लगा के देख लिया
फ़ैज़ मुबारक।
अक्षय शिंपी
(अभिनेता, कवी, दास्तानगो)
