कवीच्या अस्तित्वाचं आख्यान
अक्षय शिंपी या कवीने संग्रहाच्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक लेखकाची (कवीची) एक गोष्ट असते. ती त्याच्या लेखनात वारंवार डोकावते. हे करत असताना त्याचं नियंत्रण झुगारून डोकावते. ते कवीच्या अस्तित्वाचं आख्यान असून ते अस्ताव्यस्त, असलग, व्याकरणात नसलेलं, अव्याकृत आहे.
कुठल्याही लिखित भाषेत अराजकता माजू नये, यासाठी ती भाषा काही नियमात बसावी म्हणून व्याकरणाची निर्मिती झाली. परंतु हे नियम वर्णनात्मक असावेत, आदेशात्मक नसावेत, ही प्राथमिक अट होती. आदेशात्मक व्याकरण नाकारताना ते अस्ताव्यस्त, असलग असणे, स्वाभाविकपणे अव्याकृत असणे, ही नियंत्रण झुगारून देण्याची कवीच्या दृष्टीने अत्यावश्यक कृतीच ठरते.
सदरहू कवितासंग्रहाच्या ब्लर्बवर जयश्री हरि जोशी लिहितात त्याप्रमाणे – “ही कविता व्यक्तिमत्त्वातलं खोल दुभंगलेपण अंधारपीठाच्या भीषण वास्तवात नितळपणाची होत जाणारी शकलं आणि शब्द अर्थवलयांच्या आर्ततेवर नेमके बोट ठेवते.” माझ्या एकमेव कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत दि. पु. चित्रेही असेच लिहितात, “गवळींची कविता अत्यंत आत्मनिष्ठ आहे, एवढेच म्हणून भागणार नाही.. मानसिक एकात्मतेला तडे जाण्याचे क्षण ती चित्रित करते. मनोभंगाची, अस्तित्वभंगाची, आत्मभन्नतेची प्राथमिकच नव्हे तर टोकाचीही लक्षणे ती व्यक्त करते. मात्र वास्तवावरचे नियंत्रण गेलेल्या मनाची ही कविता नसून वास्तवावर भाष्य करणारी ही कविता आहे. वास्तवाचे पर्यायी दर्शन घडवणारी ही कविता आहे.” अक्षय शिंपी व माझ्या कवितेतला समान धागा मानवी अस्तित्वातल्या वेदनेत सापडतो.
कुठलंही अस्तित्व हे त्या काळाशी निगडित अशी क्रिया असते. कुठल्याही काळात अस्तित्व संदर्भाशिवायचे असू शकत नाही, अगदी कृष्णविवरही. सध्याचे जग हे ग्लोबल आहे व त्याचे परिणाम समस्त मानवजात उपभोगते आहे. त्यामळे या कवितासंग्रहात कवीची गाठ जलतत्त्व आणि अंधार या तत्त्वाशी घट्ट बांधलेली दिसते. आज आपण ज्या अमानुष कोलाहलात जगतो, ‘महाकाव्य’ या कवितेत –
कोलाहलातली महाकाव्य कुठल्या
यातनांचं खत पिऊन फोफावतात
अन मौनातली महाकाव्य कुठे कोरून ठेवतात हेही ठाऊक नाही
शेवटी ते असंही लिहून जातात –
पाण्याच्या तळाशी पोहोचत असताना
कोलाहल फाडत उगवत जाईन मी माझं महाकाव्य असं जन्मेल
माझ्यानंतर (पृ. १०)
कवीच्या दुर्दम्य आशावादी इच्छाशक्तीचा हा प्रतिभावान आविष्कार आहे.
‘खिन्नतेचे पक्षी’ ही एक ठाम नैतिक, राजकीय कविता आहे. आज न्यायालयाच्या सहकार्याने पर्यावरणाचा नाश होत आहे. त्यावरच्या या ओळी जे महत्त्वपूर्ण कवितिक भाष्य करतात तेही येथे नमूद करावेसे वाटते –
सतीचे अवयव पडल्यावर निर्माण झालेल्या शक्तिपीठांसारखी ही किती अंधारपीठं उगवलीत अंगणात
मी प्रत्येक विवरात खोल सूर मारून अंधाराच्या पंखांनी येतो वळचणीला खिन्न डोळ्यांनी मला दिसतो अंगणात माझ्याकडे पाहणारा कुणी माझ्यासारखाच (पृ. ११)
मानवजातीवरच्या चांगुलपणावरचा विश्वास कवी वरील कडव्याच्या शेवटच्या दोन ओळींतून स्वाभाविकपणे व्यक्त करून जातो.
आता ‘काल खंड’ हे शीर्षक योजताना कवीने जाणूनबुजून त्याचे दोन तुकडे योजलेले दिसतात. जणू त्याला सुचवायचे आहे चांगल्या काळाच्या सातत्यात पुन्हा एकदा खंड म्हणूनच तो लिहिता होता –
आपला इतिहास लिहिताना लेखकांचे हात थरथरतात
दारूण पराभवांचा इतिहास शब्दांकित करता येत नाही त्यांना –
यावरचे सिद्ध भाषेत पुढील शेवट येतो –
जुन्या दिनदर्शिका जपाव्यात जीवापाड
आपली रद्दी अधिक अधिक
वातड होत गेलेली आहे
हे तिच्याइतकं कुणीच प्रेमानं सांगत नाही
(पृ. १८)
या ग्लोबल कालखंडात आपल्या मेंदूतल्या ग्रे शेडस नाहीशा होऊन मन आणि समूह दुभंगून एकांगी झाली आहेत. कवी नेमकी याची ‘अव्याकृत’ नोंद घेत आहे. त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वात दुभंगलेपण ही स्वाभाविक गोष्ट बनून राहिली आहे. त्यामुळेच तो अगदी स्वाभाविकपणे डिस्कार्ड होत्साता लिहितो –
निघून जाताना आठवणीनं
अंगावर अंधार पांघरावा
अन
निघताना निबिड रात्रीचे दीर्घ प्रहर निवडावेत
डिस्कार्ड होताना स्वतःलाही समजणार नाही
कुठल्या विवरात आपण गुडूप झालो (पृ. १९)
मनोगतात कवी ज्या अंधारतत्त्वाला आपले सहावं बोट समजतो त्या अंधारातलाही शुभ्रपणा जाणवताना तो उपहासाने नोंदवतो –
रंगबेरंगी कपड्यात
आपण अंधारच मिरवतो कायम
तुला शुभ्र कफनात गुंडाळलं गेलंच असेल
नाकातोंडात शुभ्र कपास कोंबली गेलीच असेल
समग्र शुभ्रता मुबारक
केली गेलीच असेल
बघ, आता या कभिन्न शुभ्रतेवर अंधाराचे कंदील किती बेमुर्वतपणे
लावू शकतो मी (पृ. २१)
आता या कभिन्न शुभ्रतेवरचे अंधाराचे कंदील लावण्यापेक्षा हरवलेल्या बुद्धाने तेव्हाच सांगितले होते – ‘अत्त दीप भव’.
या निर्दयी ग्लोबल अंधारयुगात हुकुमशाही प्रवृत्ती ठासून भरलेल्या प्रधानप्रमुखाला तोंडावर सांगितले पाहिजे की, राजा तू नागडा आहेस. हेच सांगताना कवी उपहासाने नोंदवतो –
काय सांगू बाबा,
नग्नता हाच एक मोठा पोषाख असतो.
असो,
तुझी नग्नता पक्व होवो, ही सदिच्छा. (पृ. २२)
जलतत्त्वाशी घट्ट गाठ बांधलेल्या कवीच्या नदी (पृ. २८), पाणी (पृ. ३२), उदासीच्या नद्या (पृ. ४३) हे कवीचं पाण्याशी असलेलं नातं असोशीने उजागर करताना दिसतं.
अमेरिकी साम्राज्यवादाच्या साहाय्याने इस्त्रायलने गाझापट्टीत केलेला वंशसंहार व खुद्द अमेरिकेने निर्लज्जपणाने इराणी जनतेवर केलेले हल्ले तसेच रशियाने लादलेले युक्रेनवरचे युद्ध, अमेरिकेने बेकायदेशीरपणे व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना त्यांच्या देशातून उचलून अमेरिकेत आणून त्यांच्यावर खटला भरणे, ही महायुद्धसम परिस्थिती असताना अक्षय त्याच्या ‘महायुद्ध’ या हादरवून टाकणाऱ्या कवितेत –
माझ्या गोष्टीनंच
महायुद्ध पुकारलंय माझ्याशी
गोष्ट स्वतःतले प्रसंग अनुभव
शस्त्रास्त्रांसारखे वापरते माझ्या विरोधात
पण मीही हरणार नाही
अजिबात नाही हरणार
ही चकमक
मी माझी गोष्ट नव्याने लिहिणार आहे
गोष्टीवर डागण्यासाठी
मी स्वतःचंच शस्त्र करणार आहे
आत्मघातकी (पृ. ३४)
या पृथ्वीलाच विद्रूप करणाऱ्या संहाराला नाकारण्यासाठी कवी स्वतःचंच शस्त्र करणार आहे आत्मघातकी.
महायुद्धाला एवढे थेटपणे भिडण्याची ताकद एकूणच दुर्मिळ.
आता नमूद केलेला ‘पार्थिव’ या कवितेतलं शेवटचं कडवं हे सद्यकालीन स्थितीचे अत्यंत विदारक वर्णन करते –
अखंड निर्मनुष्य शहरातून
कुणाच्या अंत्ययात्रा वाहाताहेत
निरंतर?
खरोखर आपण सजीव म्हणून आपलं जगणं शुभंकर
करत आहोत का?
आपलं रोजचं जगणं हीच एक निरंतर अंत्ययात्रेसमान आहे. ही विफलता भावनेच्या आहारी न जाता अत्यंत तटस्थपणे उद्धृत केलेली आहे.
यातील कविता – २ (पृ. ५८) हा कवीचा कवितेकडे पाहण्याचा प्रगल्भ दृष्टिकोन दर्शवतात.
मी लिहितो कविता तेव्हा यातनांचं अरण्य
शरीरभर खुलून येतं आणि रंध्रारंध्रातून
पाझरायला लागतो जीवनरस
यातनांच्या अरण्यातूनही जीवनरस पाझरू लागणं हे कुठल्याही कवीचं फार मोठं शक्तिस्थान आहे.
अगदी आवर्जून नमूद करावीशी वाटणारी एक बाब अशी की, व्यासांच्या ‘महाभारत’ या महाकाव्याची गोष्ट या कवितेतून सांस्कृतिक संदर्भ देऊन उडवलेली खिल्ली अप्रतिमच. (पृ. १३)
कवितासंग्रहाच्या लहान आकारमानापेक्षाही (अगदी पृष्ठसंख्येसह) या कवितेने व्यापलेला प्रचंड मोठा अवकाश या कवितासंग्रहाची गुणवत्ता निर्विवादपणे सिद्ध करतो.
अव्याकृत, अक्षय शिंपी, २०२६, लोकवाङ्मय गृह, पृष्ठे : ६४
मूल्य : १५०/-
– अरुणचंद्र गवळी | (लेखक पुणेस्थित कवी आहेत.)
पूर्वप्रसिद्धी:
१६ ते ३० सप्टेंबर २०२६ ।
परिवर्तनाचा वाटसरू
