अस्तित्वाचं ‘अव्याकृत’ आख्यान
कवितेलाच अर्पण केलेला, कवी अक्षय शिंपी यांचा ‘अव्याकृत‘ हा कवितासंग्रह ‘लोकवाङ्मय गृह’ ने प्रकाशित केला आहे. ‘बिनचेहऱ्याचे कभिन्न तुकडे’ हा अक्षय शिंपी यांचा पहिला कवितासंग्रह. कबूद रंगात रंगवलेले, गूढतेचा आभास दर्शवणारे, ‘अव्याकृत’चे समर्पक मुखपृष्ठ चित्रकार गणेश विसपुते यांनी चितारले आहे. दिनकर मनवर यांच्या मांडणीने सजलेला, क्राऊन आकारातील हा कवितासंग्रह, समोर दिसताच हाती घ्यावासा वाटतो. बंद खिडकी उघडावी तसे आपण संग्रहातील एक एक पान उलगडत जातो आणि अक्षय शिंपी यांच्या ‘अव्याकृत’ कवितांच्या कबूद रंगात आपण गढून जातो. अक्षयच्या कवितांनी धरलेली वेगळी वाट वाचकांच्या लक्षात येण्यास तसा वेळ लागत नाही. अक्षयच्या कवितांना ‘सो कॉल्ड’ कविता म्हणून संबोधता येणार नाही. ‘उभा देह कवितेचा / शब्दांच्या पेशी/ प्रवाह अनेकार्थांचे / लयबद्ध’ अशी एक कवितेची व्याख्या आहे. अक्षयची कविता या व्याख्येला साजेशी आहे, असे म्हणता येईल. संग्रहाच्या प्रारंभी अक्षयच्या कवितेने अपेक्षा व्यक्त केली आहे, ‘या स्ट्रोक्सशी जोडून घेता आलं तर आनंदच आहे. या स्ट्रोक्समुळे आपापल्या अंधाराचा मूळ रंग पाहता आला, खळाळ ऐकता आला, तर हे अव्याकृत आख्यान मुक्कामी पोहोचलं, असं म्हणता येईल.’ स्वतःचे उत्खनन करायला लावणारी ही कविता आहे. त्या अर्थाने या कवितांना आध्यात्मिक कबूद रंग आहे.
अक्षय शिंपी यांच्या कवितेचा रस्ता कवी अरुण कोलटकर यांच्या कवितेच्या दारावरून जाताना दिसतो. ‘अव्याकृत’ मधील कविता वाचताना हे लक्षात येतं. कोलटकरांच्या कवितेमधील गूढ प्रतिमा आणि अस्तित्ववादाचा साक्षात्कार, अक्षयच्या कवितांमधूनही अनुभवास येतो. अभिव्यक्तीच्या दृष्टीनेही अक्षयची कविता कोलटकरांच्या कवितेला सलाम करून मार्गी लागल्याचे ठळकपणे जाणवते. अक्षयच्या कवितेवरील हा दोषारोप नसून, तर ते कवीच्या अंगी असावे असे गुणग्राह्यतेचे लक्षण आहे, असे मी म्हणेन. कवितेतील बंबईया भाषेचा वापर हा देखील एक समान दुवा सांगता येईल.
अक्षय शिंपी यांच्या ‘अव्याकृत‘ या कवितासंग्रहास कवयित्री जयश्री हरि जोशी यांची पाठराखण लाभली आहे. त्यात त्या लिहितात, ‘मानवी अंतर्मनाचा तळठाव घेणाऱ्या ‘स्व’ च्या संज्ञा प्रवाहाची ही मुक्त धारा आहे.’
‘अव्याकृत‘ मधील अक्षयची कविता अल्पाक्षरी म्हणता येईल. त्यामुळेच असेल, अक्षयची कविता आणि कवितेतील प्रत्येक ओळ गोळीबंद आहे. संग्रहातील ‘इशारा’ कवितेत, वैरी मौजूद आहे अन् रात्रही / फक्त आपण कुठे हरवलो आहोत / हाच मुद्दा आहे. ‘शहर’ कवितेत, नगरीsss आबादss रहे ssss म्हणतानाच हे समजून की/ शहर अद्याप शिल्लक उरलंय! ‘सत्य’ कवितेत, वस्तूंच्या लगद्यात / सत्य वस्तू झालेलं होतं. अशी अनेक उदाहरणं देता येतील जिथे प्रत्येक कविता गोळीबंद आहे. कवितेतील प्रत्येक ओळ वाचकाच्या मनावर ठसा उमटवणारी आहे. वाचकाला चकित करणारी खुमखुमी प्रत्येक कवितेला असतेच असे नाही. अक्षयच्या कवितेला मात्र ती आहे. जशी अरुण कोलटकर यांच्या कवितेला आहे. अभिव्यक्तीतील रोखठोक, स्पष्ट वृत्ती. प्रतिमांमधील चमत्कृती, विरोधाभास, वाचकाला चकित करणारा ठरतो. ‘अव्याकृत’ मधील प्रतिमासृष्टी याच धर्तीची आहे. यातनांचं खत, बहिरी नाव, उन्हाचे वळ, यातना वृद्धी, उन्हाची नदी, जवान शेवाळ, खिन्नतेचा पक्षी, निर्माल्याची पक्वता, जातिवंत यातना, अंधाराचे कंदील अशा काही प्रतिमा वाचकाला खिळवून ठेवतात. ‘अव्याकृत’ मधील अक्षयच्या कवितांना अभंग रचनेचे आकर्षण दिसून येते. त्या दृष्टीने संग्रहातील, वाद, साक्षात्कार – १, मीच, मुक्तीगान, पांडुरंग, निळाई, या अभंग रचना वाचकाला गुंतवून ठेवतात. या अभंग रचनांमध्ये कवीने तंत्रस्वातंत्र्य घेतल्याचे दिसून येते. अक्षयच्या या
अभंग रचनांचा ‘मुक्ताभंग’ म्हणून उल्लेख केल्यास चुकीचे ठरू नये. संग्रहातील उपहासात्मक कविता वाचकाला अस्वस्थ करतात. ‘स्वगत’ मधील, ‘माझा संकर झाला तर माझ्याच कुबड्या तुम्हाला वापरणं सोयीचं होईल.’ अशा काही ओळी वाचकाला विचारप्रवृत्त करतात. ‘अव्याकृत’ मधील एकूण कविता वाचनीय आहे, हे आता वेगळेपणाने सांगण्याची आवश्यकता नाही. संग्रहातील ‘डॉ. आंबेडकर’ या कवितेचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. या कवितेतून कवीची आणि त्याच्या कवितांची पातळी, समज, ‘स्व’ला शपथ घालणारी निर्भीडता, मर्यादा या सर्वव्यापी गुणांचे दर्शन होते. ‘पण माझ्या मुळांना तुझं / खतपाणी आहे / हे विसरणारही नाही/कधीच.’ अशी जाणीव ठेवणारी अक्षय शिंपी यांची कविता आहे.
_
नारायण लाळे (narayanlale@gmail.com)
‘अव्याकृत’,
कवी : अक्षय शिंपी,
प्रकाशक: लोकवाङ्मय गृह,
पृष्ठे : ६४
मूल्य : ₹ १५०/-
