Description
मराठीत स्फुट लेखनाची आणि ललित निबंधांची दीर्घ परंपरा आहे. पूर्वी, म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठीच्या मंगल वाचन, नवयुग वाचनमाला, सुभाष वाचनमाला अशा पाचवी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकात त्यातले उतारे अभ्यासासाठी असत. त्यात इतिहास, समाजकारण, प्रथा, परंपरा यांना हाताशी धरून शालेय विद्यार्थ्यांना रंजकतेने मराठी संस्कृतीच्या नाळेशी जोडले जात असे. ही पुस्तके संपादित करणाऱ्या मंडळींची नावे प्र. के. अत्रे, वि. स. खांडेकर, वि. म. कुलकर्णी, श्री. म. माटे अशी तालेवार! या लेखन परंपरेचा ‘सटायर फटायर’ हे पुस्तक म्हणजे अर्वाचीन अवतार म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
मी शफाअत खान यांच्या नाटकांबरोबरच स्फुट लेखनाचाही पहिल्या रांगेतील वाचक – चाहता आहे. त्यांच्या लेखनाच्या मिसळवणाच्या डब्यात अत्रे, जयवंत दळवी, पु. ल., तेंडुलकरांच्या ललित लेखनापासून ते अलीकडच्या मुकुंद टाकसाळेपर्यंत अनेक मसाल्यांच्या आणि विविध देशी-विदेशी व्यंगचित्रकारांचे कप्पे आहेत. पण या सगळ्याला जी धार किंवा चव येते ती शफाअत खान यांच्या सुस्पष्ट राजकीय भूमिकेमुळे. त्यांची राजकीय भूमिका विनोदाने कधीही झाकोळली जात नाही. किंबहुना विनोदाचे कोंदण त्यांचे लेखन अधिक गहिरे करत नेते.
‘ठणठणपाळ’ हा जसा जयवंत दळवी यांचा साहित्य आणि साहित्यिक टिका कटाक्ष होता तसा शफाअत खान यांचे स्फुट लेखन हा समकालीन संस्कृती -समाज – राजकारण या जत्रेतील रंगीत, हास्यरसप्रधान, तालेवार चित्रपट आहे. वरकरणी स्फुट वाटणाऱ्या या लिखाणाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या उदारमतवादी लोकशाही परंपरेत घट्ट रूजलेली आहेत.
विशेष म्हणजे हे लिखाण २०१२ पूर्वीचे आहे पण त्यात २०१४ नंतरची प्रतिबिंबे सुस्पष्ट दिसतात.
– सतीश आळेकर








Reviews
There are no reviews yet.