‘अरसड’ : मायलेकराची हृद्यस्पर्शी शोकात्म कहाणी
‘लेकीचा जलम कोणा घातला येड्यानं, पराया घरी बैल राबतो भाडयानं’ हे लोकगीत स्त्रीमनाची सल सांगते, कष्टकरी कुळबिणीची व्यथा पहिल्यांदा जोतिबांनी अखंडातून मांडली, सत्यशोधकी विचाराचा प्रभाव असलेल्या ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ या ग्रंथात स्त्रियांच्या शोषिकतेचा तौलनिक पाढा टोकदारपणे मांडलाय, ‘मी वनवासी’, ‘आयदान’, ‘मला उद्ध्वस्त व्हायचयं’, ‘नाच गं घुमा’, ‘माझ्या जन्माची चित्तरकथा’, ‘सांगते ऐका’, ‘मिटलेली कवाडे’, ‘मरणकळा’, ‘जिणं आमचं’, ‘बिनपटाची चौकट’ या मराठीतील प्रातिनिधीक स्त्री आत्मकथनाची शीर्षकं तरी काय सांगू पाहतात ? ग्रामीण भागातील कष्टकरी स्त्रियांच्या वेदनेविषयी काय बोलावं ? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिचं राबणं कोणत्या शब्दात मांडावं ? कुटुंबातील सर्वांची पोटपूजा झाल्याशिवाय ती तुकडा मोडत नाही, अर्थात टोपल्यात शिल्लक असेल तेवढाच, दिवसभर केलेल्या कामाचं मोल, कौतुक बाजूलाच राहतं. उलट नवऱ्याच्या अत्याचाराला तिला सामोरं जावं लागतं. लग्नानंतर तिचं माहेरपण चार दिवसापुरतं. स्त्री सबलीकरणासाठी झटणारी स्त्रीवादी चळवळ शहरी मध्यमवर्गीय स्त्रीपुरती सिमीत राहिली. ती खेड्यांपर्यंत पोहोचू शकली नाही, खेड्यातील स्त्रियांच्या सन्मानाचा धाडसी प्रयत्न केला तो शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने, चांदवडच्या प्रसिद्ध अधिवेशनात लाखो स्त्रियांनी आपल्या दुःखाला वाचा फोडली, ‘चांदवडची शिदोरी’ या छोटेखानी पुस्तिकेतून तिथल्या बोलक्या भावना जिज्ञासूंना समजून घेता येतील. हे सारं आठवायचं निमित्त असं की, ‘लोकवाङ्मय गृह’ ने प्रकाशित केलेली ‘अरसड’ ही व्यंकटेश सोळंके यांची कादंबरी. दोनशे अठरा पृष्ठसंख्या असणारी ही कादंबरी, संख्यात्मक पृष्ठांचा विचार करता दोनेक बैठकीत वाचून हातावेगळी होणारी; पण या कादंबरीने मला खूप दमवलं, रडवलं, वाचताना कमालीचा त्रास दिला.
‘अरसड’ ही तशी व्यक्तिकेंद्री कादंबरी, ती मनी या स्त्रीचा सासुरवास उभा करते, तसा हा ‘सासुरवास’ अनेक रूढी, परंपरा, धर्म व पुराणग्रंथातून पद्धतशीरपणे लादला गेलाय. तो लादला गेलेला आहे हेही सहजासहजी कळत नाही. स्त्रीच्या ‘जखडले ‘पणाचं लक्षवेधी चित्र मिलिंद कडणे यांनी कादंबरीवरील मुखपृष्ठातून साकार केलंय. ते वाचकांना आतमध्ये डोकवायला प्रवृत्त करतं. आजही ‘बाईपण भारी देवा’ बघायला ‘सावित्री’च्या लेकी रांगा लावतात. पुराणग्रंथातल्या ‘सावित्री’चं सोडा पण अंगावर दगड-शेण झेलून ‘अक्षर’ गिरवायला भाग पाडणाऱ्या क्रांतिज्योतीला हे चित्र बघून काय वाटतं असेल ? ‘अरसड’मधील मनी ही धार्मिक प्रकृतीची, दैववादी, परिस्थितीशरण, सहनशील स्त्री. ती आपल्या सासू, सासरा वा पतीनं केलेल्या अत्याचाराविरुद्ध विद्रोह करीत नाहीये, वाचतांना डोळे ओले करणारा, अंगावर भीतीचे शहारे उमटविणारा छळवाद सहन करते. ‘आलिया भोगासी’ हा जगण्याचा भाग बनविते. पोटी जन्माला आलेला मुलगा ‘रमण’ हा पुढे भलेपणाचे दिवस आणेल, या आशावादावर ती संघर्ष झेलत राहते. ती कधी भाबडेपणाने रामकुंडावर ‘कौल’ लावताना दिसते, तर कधी किनाळच्या शिवदास महाराजांना पंचांग बघून रमणाची कुंडली बघताना दिसते. ‘बाळाचं भविष्य उज्ज्वल आहे. हा रमना कुटुंबाचा उद्धार करेल; पण त्यासाठी उचित वेळ आणि काळ महत्त्वाचा आहे’, हे महाराजांचे बोल सासरच्या त्रासाने पिचलेल्या, खचलेल्या मनीला जगण्याची उमेद देतात. तसं मनीचं जगणं ‘अरसड’ बनलेलं, ‘अरसड’ हा तसा नांदेडी बोलीतील शब्द, अन्य भागातील वाचकांना कळायला अवघड; पण कादंबरीच्या उत्तरार्ध एकशे ऐंशीव्या पृष्ठावर कादंबरीकार त्याचा अर्थ सूचित करतो, ‘अरसड’ म्हणजे पडीक – खरबाड रानं, जिथं कसलंच पीक पिकत नाही. गुरं-ढोरं पिकाऊ जमिनीवर येऊ नयेत तिथंच रमावेत अशी झाडाझुडपांनी आच्छादलेली जंगली बिनपिकाऊ जमीन. मनीचं आयुष्यसुद्धा असंच ‘अरसड’ रानासारखं शून्य किमतीचं पण रमणाचं आयुष्यात येण्यानं सकारात्मक बनलेलं, ‘अरसड’मधील रमणाची व्यक्तिरेखा वाचकांचे लक्ष वेधून घेते. रमणाचं करपलेलं बालपण खूप ताकदीने कादंबरीत येते. आजी-आजोबा, सावत्र आई व पित्याच्या तिरस्काराचा तो जसा धनी बनतो तसा आजोळी मामाकडून उपेक्षिला जातो. आजारी रमणाला दवाखान्यात नेण्याचं काम परकी असलेली गडी माणसं करतात. बाप असलेला चक्रम साधी चौकशीही करीत नाही, ‘रमणा वाचला काय अन् मेला काय?’ याचं सोयरसुतक कुणालाही नव्हतं, बालवयात शेतरानातली कामं अर्धपोटी उपाशी राहून त्यास पेलावी लागत. प्रतिकूल परिस्थिती माणसाला जशी छळते तसं अंगभूत शहाणपणही देते. ते शहाणपण, विवेकपण रमणाच्या व्यक्तिमत्त्वात दिसतं, निष्ठूर आजी गंगनबाई सणाच्या दिवशी दिवसभर खायला काही देत नाही. दगडधोंड्याच्या रूपात देवळांत, देवळीत, दगड ओट्यावर बसलेल्या गावगाड्यातील देवी-देवतांना नैवेद्य ठेवण्यासाठी उपाशीपोटी पिटाळत असे. त्या नैवेद्याची खरी गरज देवी-देवतांना नसून उपाशी पोटी असलेल्या रमणाला असते. घरच्यांची नजर असते म्हणून देव्हाऱ्यातील नैवेद्य तेवढा ताटात शिल्लक ठेवतो. बाकीचे वीस-पंचवीस चिपटे कुणाला न दिसतील अशा झाडाखाली बसून रमणा खाऊन टाकतो. गंमत म्हणजे देवही रुष्ट होत नाहीत. जिथं नैवेद्यानं जायला तिथं ती नेमकी जातात. कादंबरीतील हा प्रसंग मला विशेष स्पर्शून गेला. रमणाच्या निमित्ताने पूर्वी गाव-खेडयातील श्रद्धा, परंपरा, चालीरीती, मनोरंजनाची साधनं, खेळ, सण-उत्सव त्यातील बारकावे समजून घ्यायला मदत होते.
व्यंकटेश सोळंके यांच्या ‘अरसड’ कादंबरीत विविधांगी प्रकृतीच्या, प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा साकारल्या गेल्यात. यादव, सूर्याजी, गंगनबाई, चक्रम, मारोती या व्यक्तिरेखा खलनायकी भूमिकेत भेटतात, माणसानं किती स्वार्थी, आपमतलबी, कृतघ्न, पाषाणहृदयी असावं, हे उक्त व्यक्तिमत्त्वाकडे बघून वाटतं. केशव, मालतीबाई, रजाबाई, आनंद, राधाबाई, मुल्ला गुरुजी, शाहीर सास्तुमबुवा वजीरगावकर प्रल्हाद, शंकर कुंभार, इटू-पुंडा यांसारखी कितीतरी पात्र अंगी असलेल्या चांगुलपणानं वाचकांचं लक्ष वेधून घेतात. भवतालात हिंदू-मुस्लिमधर्मीय संघर्षाचे विष पसरविलं जातंय; पण खेड्यापाड्यात हे वातावरण सौहार्दपूर्ण दिसून येतंय, याचा प्रत्यय कादंबरीत दिसून येतोय, शादुलसारखा मुस्लिम तरुण वारकरी संतांच्या रचना जपतो, अभंग, ओवी, गवळणी व भारूड गातोय, पंचक्रोशीतील भजनी मंडळीत शादुलाची जुगलबंदी कौतुकाचा, अप्रूपपणाचा भाग बनते. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ या वारकरी विचारांचा अंमल इथं पाहायला मिळतो, खऱ्या अर्थानं सुफी संतांनी लोकांमध्ये भाईचारा संस्कृती निर्माण केली. ती वीण घट्ट असल्याचे सूचन कादंबरी करते. कादंबरीतील दुसर उदाहरण मुल्ला गुरूजींचं, मुल्ला गुरूजी रमणाची आई मनीला शिक्षणाचं महत्त्व पटवून देतात, ‘अब तुम्हारी इज्जत बढ़ाने की है तो रमना को शिकाना पड़ेगा। ये बिगड़ गया तो तुम्हारी इज्जत भी बिघडेगी। इधर पत्ते, पैसे और गोट्या खेलने मे माहीर बनेगा। पढ़ाई में बुद्ध बनेगा’ म. फुलेंच्या मनातल्या शिक्षणविषयक गोष्टी इथे मुल्ला गुरुजी सांगताना दिसतात, ‘अरसड’ कादंबरीतील निवेदक मुस्लिम मुस्लिमेतर नातेबंधाचा पूर्वग्रहरहित दृष्टीकोन उभा करतोय, ही बाब मला खूप थोर, महत्त्वाची वाटते.
व्यंकटेश सोळंके यांची ‘अरसड’ कादंबरी केवळ कौटुंबिक नातेसंबंधावर भाष्य करीत नाही, तर ती आपला भौगोलिक, सांस्कृतिक व भाषिक ऐवज मनस्वीपणे उभा करते. पूर्वी या भागातून बाबू बिरादार, प्रदीप धोंडीबा पाटील यांच्या कादंबऱ्यांतून तर अलिकडे हंसराज जाधव यांच्या ‘मोहरम’ कथासंग्रहातून हा भाग भाषिकदृष्ट्या सशक्तपणे आला आहे. ‘अरसड’ च्या माध्यमातून व्यंकटेश सोळंके यांनी हा वारसा समर्थपणे पेलला आहे, गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या ‘राहेर’ गावचे ऐतिहासिक, धार्मिक व आध्यात्मिक थोरपण कादंबरीत विस्ताराने आलं आहे. महानुभाव संप्रदायाचे श्रद्धास्थान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचं मोठेपण कादंबरीतील निवेदक सांगत जातो. कादंबरीची सुरुवातच रामतीर्थ गावाच्या पुरातन आध्यात्मिक वारसापासून होते. तिथलं शिवमंदिर, शिवलिंग बादशहा, औरंगजेब बादशहा व सुफी संत बंदगी यांच्याविषयीच्या आख्यायिका- दंतकथाने होते. कामनमाळ, लामकाणी, खडोळी, मोघाळी, शिरूर, कार्ला, हळदा, हस्सापूर, धार्जणी, बेंबर, गोरठा, उमरी, भोकर, थेरबन व राहेर या नांदेड जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात ‘अरसड’ कादंबरीचं कथानक फुलत जातं. तिथली भूमी – भूभाग, भाषा, मानवी व्यवहार, चालीरीती, परंपरा, संस्कृती, धार्मिक व आध्यात्मिक वारसा कादंबरीतून उकलत जातो. या भागातील नैसर्गिक बारकावे कादंबरीकार नोंदीत असल्याची प्रचिती वाचकांना होते. उदा. शेंदऱ्या, गोटया, रसाळ्या, पोपटया, चपट्या, कोंडल्या, केळ्या, नांगऱ्या, पितऱ्या या आंब्याच्या विविध जाती कथानकात एकरूप होऊन येतात, घरगुती औषधी उपचारावरही कादंबरी नेटकेपणाने भाष्य करते, उदा: बाळंतपणात बाई बेशुद्ध पडल्यावर हळदीच्या खोंबाचा चुटका देणे, लहान मुलांना खोकला असो की, वयस्करावरील दम्यावर उपाय म्हणून मव्हाच्या दारूची योग्य मात्रा देणे, पायात काटा खुडल्यावर रुचकीचं पान उकडून बांधणे, जखम जोडीचा पाला चोळून लावणे – आदी उपचार कादंबरीत समजून घ्यायला मदत होते.
भाषिक निराळेपण जपण्यात ही कादंबरी यशस्वी ठरली. ‘निवद’, ‘बोटवे’, ‘निरणात’, ‘आदुगर’, ‘लामन’, ‘हुटाडी’, ‘पऱ्हाट्या’, ‘हेकुळणी’, ‘फरोळ’, ‘बुरकुंड’ अशा कितीतरी मराठवाड्यातील नांदेडी बोलीभाषेतील शब्दकळा कादंबरीतून येतात. सोबतच ‘बडा घर पोकळ वासा, असा कसा तुमच्या वागण्याचा खनोटा ?’, ‘देव्हारी नायी देव अन् नुसतीच उठाठेव’, ‘आयजीच्या नावावर बायजी उधार’, ‘एक तर माहेर नाही तर शेवटचा माहेरचा आहेर’, ‘कुठली कोण अन् माजलेली वान’ अशा असंख्य म्हणी- वाक्प्रचाराने ‘अरसड’ या कादंबरीची उंची वाढली आहे. काही ठिकाणी दख्खनी हिंदी भाषिक संवाद साधला आहे. कादंबरीकाराचं कविमन लपत नाही. ते आपली कविता रमणच्या माध्यमातून पेरतो. परिणामी कादंबरीतील वाचनीयतेचा अवकाश अधिक रुंद होतो. मात्र कुठं कुठं कादंबरीकार आध्यात्मिक प्रवचन दिल्यासारखा तत्त्वज्ञान निवेदन करतो. (पृ. ९२, पृ. १०५) जे कथानकातील औचित्याचा भंग केल्यासारखं वाटतं. व्यंकटेश सोळंके यांची ‘अरसड’ ही कादंबरी आत्मचरित्रात्मक असल्याची वाचताना राहून राहून शंका येते. कादंबरीतील नायक ‘रमण’ हा स्वतः लेखक ‘व्यंकटेश’ सोळंके तर नसावा! पृष्ठ क्रमांक १७ वर मनीच्या बाळाच्या कानात फुंकर घालून ‘व्यंकटरमणा गोविदा’ असा नावाचा उच्चार केला जातो. त्यातील ‘व्यंकटरमणा’मधील रमण’ हे नाव बाळाला ठेवले जाते. आई मुलांच्या नात्यातील अद्वैत भावविश्व, अनुभवविश्व ज्या निगुतीने, संवेदनशीलतेने आलेलं आहे, जे वाचकांच्या डोळ्यांत अश्रू उभे करतं. मनाला स्पर्श करतं, त्या अर्थानं ही साहित्यकृती आत्मचरित्रात्मक कादंबरीचे प्रारूप तर नाही ना?
मिलिंद कडणे यांच्या कुंचल्यातून साकारलेलं मुखपृष्ठ कादंबरीचं आशयमूल्य अधिक उंचावत, डॉ. मधुताई सावंत यांचा ‘ब्लर्ब’ कादंबरीचा नेटका गाभाशय उलगडून दाखविणारा आहे, ‘लोकवाङ्मय गृह’ ने केलेली प्रकाशकीय मेहनत प्रकर्षानं जाणवते. व्यंकटेश सोळंके यांची सशक्त लेखणी वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल, असा अढळ विश्वास आहे.
अरसड
व्यंकटेश सोळंके
प्रकाशक : लोकवाङ्मय गृह,
मुंबई (मे २०२५) पृष्ठ : २१८
किंमत : ४०० रू.
– ज्ञानदेव राऊत, लातूर
