मूल्यभान देणारी कादंबरी : ब्लाइन्ड फ्रीडम
लेखक राजा भोयर यांच्या ‘ब्लाइन्ड फ्रीडम‘ या कादंबरीची सुरुवातच मुळी स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्य आंदोलनातील बाल स्वातंत्र्य सैनिकाच्या अनुभवाने होते. तीन तपाअगोदर अनुभवलेल्या स्वातंत्र्य चळवळीतील अनुभव नानांच्या डोळ्यासमोर उभे होत जातात. लेखकाने फ्लॅशबॅक पद्धतीने नानांचा अनुभव चितारला आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेने प्रेरित झालेली नानांची पिढी, त्यांचा संघर्ष, मूल्यांसाठी सर्वस्व त्यागण्याची वृत्ती हे सर्व आताच घडून गेल्यागत त्यांच्या डोळ्यापुढे उभं राहतं.
स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असल्यामुळे लहानग्या नानाला जेलमध्ये टाकलं जातं. तेथील कैद्यांचं, कोठडीचं, शिक्षेचे वर्णन लेखकाने जिवंत उभे केले आहे. या वर्णनातून कैद्यांना होत असलेल्या यातनांची अनुभूती आपल्यासमोर साक्षात उभी राहते. या साऱ्या वर्णनातून स्वातंत्र्यपूर्व इंग्रज राजवटीत, स्वातंत्र्य आंदोलनात देशभक्त स्वातंत्र्य सैनिकांनी किती यातना भोगल्या, त्यातून आपल्या वाट्याला हे स्वातंत्र्य मिळालं. जी स्वतंत्रता आपण अनुभवत आहोत ती सहज नाही मिळाली. प्रचंड मोठा संघर्ष आपल्या पूर्वसुरींना करावा लागला. त्यांच्याप्रति कृतज्ञता निर्माण करण्यास हे प्रसंग बाध्य करतात. इतके ते जिवंत झालेले आहेत.
या कादंबरीचा आवाका जवळपास पाऊण शतकाला कवेत घेणारा आहे. नानांची आदर्शवादी पिढी आज अस्तंगत होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात संपूर्ण आदर्शवादाने भारावून गेलेली एक पिढी स्वातंत्र्य आंदोलनात सर्वस्व त्यागून उडी घेते. त्यात त्यांचं तारुण्य जातं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही पिढी स्वस्थ वसत नाही. आपल्या आदर्शावर कायम राहून स्वातंत्र्योत्तर भारतातील सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर कार्य करीत राहते. पूर्वीच्याच जोमाने त्यांची लढाऊ वृत्ती कार्यरत असते. ते येथील व्यवस्थेला प्रश्न विचारत राहतात. त्यांनी अपेक्षिलेले स्वातंत्र्य त्यांना इथे दिसत नाही. परकीयांशी लढणं सोपं होतं. स्वकीयांशी लढताना मात्र त्यांना निराशा
आणि हतबलता जाणवते.
त्यांच्या नंतरच्या पिढीमध्ये मात्र आदर्शवाद आणि व्यवहारवाद याचे गुणोत्तर जुळत नाही. जे आदर्शवाद निवडतात, त्या मार्गावर चालतात त्यांच्यावर अपयशाचा शिक्का बसतो. व्यवहार वादाच्या मार्गावरून चालताना मात्र यशस्वी गणला जातो. व्यवहारवादी होताना आदर्शवाद सांभाळताना समकालीन पिढीची होणारी घुसमट कादंबरीच्या पटावर विखुरलेली आहे. त्या अर्थानं स्वातंत्र्यानंतर ७० च्या दशकात जन्मलेल्या एका पिढीच्या आदर्श मूल्यांची फरफट आणि जगण्यावर स्वार झालेला व्यवहारवादाचा घोडा याचा पट नानांचा धाकटा मुलगा भालचंद्रच्या माध्यमातून लेखक व्यवस्थेचे अंतःप्रवाही रूपाचा एक्स-रे काढून आपल्यासमोर मांडतात. स्वातंत्र्योत्तर कालखंडात लोकांचे प्रश्न घेऊन नाना समाजवादी विचारसरणीने लढत असतात. नवीन आलेले राजकारणी, त्यांचे उबग आणणारे अनुभव, कोणत्या स्वातंत्र्यासाठी आपण लढलो, याचे वैफल्य जाणवते. त्याग, निष्ठा, सामाजिक बांधिलकी या गोष्टींचा राजकारणी लोकांचा दुरान्वयानेही संबंध नाही, हे जाणवत राहते. ते हतबल होतात.
‘गरजा कमी ठेवल्या की मन भ्रष्ट होत नाही, दुसऱ्याची भूक समजून घेतली की अर्धपोटी राहूनही पोट भरल्याचे समाधान मिळू शकतं, हे त्यांचं तत्त्वज्ञान, कुटुंबियांनाही ते या आदर्श वैचारिक चक्रव्यूहात अडकवू पाहत होते.’ हे नानांचे वर्णन यथार्थ आहे. या आदर्शवादाचा त्यांचा मोठा मुलगा सुधाकरला फटका बसतो. केवळ नानांचा मुलगा आहे म्हणून त्याला एका संस्थेत प्रवेश नाकारला जातो. तेव्हा पुढच्या वेळेस मात्र तो ठरवून वडिलांचे नाव सांगत नाही तेव्हा त्याला प्रवेश मिळतो. ज्या आदर्शवादाने स्वाभिमानाने डोकं वर करून ताठ मानेने चालायला पाहिजे, तोच आदर्शवाद मुटकुळं करून अडगळीत पडला आहे आणि आणि व्यवहारवाद व्यवहारवाद मात्र निर्लज्जपणे छाती काढून चालतो, हे वास्तव लेखकाने अधोरेखित केले आहे.
भालचंद्र इंजिनीअर होतो. वशिलेबाजी, पैसा यामुळे त्याला कुठेच नोकरी लागत नाही. तो निराश होतो. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, कंत्राटदारांकडे तो काम करतो. त्यातील प्रादेशिकवाद, भ्रष्टाचार, मजुरांचे शोषण त्याला अस्वस्थ करते. तो अगतिक होतो. त्याच्या प्रामाणिकतेमुळे त्याचे भ्रष्ट वरिष्ठ त्याला छळतात. त्यामुळे तो अधिक अगतिक होतो; आणि शेवटी नोकरी सोडून आपल्या मित्रासोबत स्वतःची कंपनी सुरू करतो. परंतु तेथेही त्यांची अस्वस्थता संपत नाही. विविध परवान्यांसाठी सरकारी कार्यालयात त्याला खेटे घालावे लागतात. तेथील सरकारी अधिकाऱ्यांची मग्रुरी, त्यांची भ्रष्टाचारी वृत्ती याचा त्याला सामना करावा लागतो. ही भालचंद्राची तगमग कादंबरीभर व्यक्त होत राहते.
भालचंद्राने वडिलांच्या पिढीचा आदर्शवादाचा झालेला भ्रमनिरास अनुभवला असतो. तोच आदर्शवाद गुंडाळून तो जगत जातो. तेव्हा त्याची होरपळ होत जाते. पण तो व्यवहारवादाच्या अनिर्बंध घोड्याला स्वतःवर हावी होऊ देत नाही. हे प्रभावीपणे लेखकाने मांडले आहे. कादंबरीचा पट दीर्घ असला, तरी कथेचा मुख्य धागा कुठेच सुटत नाही. सलग ती वाचकांच्या मनात प्रवाही राहते. भाषिक अर्थाने कादंबरीतील संवाद हे चंद्रपूर जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या चंद्रपुरी बोलीमध्ये आलेले आहेत. ते जिवंत वाटतात. एका समकालीन प्रामाणिक, आदर्शवादी पिढीची, समकालीन वास्तवातील भावविश्व, विचारविश्व, मनोवस्था चितारणारी ही मराठीतील महत्त्वाची कादंबरी आहे.
- सुनील यावलीकर
कादंबरी – ब्लाइन्ड फ्रीडम
लेखक – राजा भोयर
प्रकाशक – लोकवाङ्मय गृह
पृष्ठे – ३३९ | किंमत ₹ ५००/-
