लोकवाङमय गृह

Shop

मधल्या मध्ये । गणेश वसईकर

Original price was: ₹120.00.Current price is: ₹100.00.

प्रिय गणेश,
तुझ्या कविता मी वाचल्या, पुन्हा वाचल्या, पुन्हा पुन्हा वाचल्या. मी माझंच चरित्र परत परत वाचत होतो, जे तुझं आहे. खरं तर या शहरात राहणाऱ्या तुझ्यामाझ्यासारख्या कुणाचंही ते असं चरित्र आहे की ज्याच्या प्रत्येक ओळीवरून चालताना आपल्या एकाग्रतेची खिडकी धडधडत राहते. तू गलबतांच्या गावातून उपनगरात आलास आणि मी कारखान्यांच्या शहरातून त्याच उपनगरात आलो. दोघांचंही भागधेय असं की आपल्याला रोजीरोटीसाठी पुन्हा शहरातच ट्रेनच्या घनघोर गर्दीतून टाचा घासत नोकरीसाठी जावं लागतं. इतरांनी वापरून गुळगुळीत झालेल्या लोकलच्या दांड्यावरचा हात कधीही निसटेल इतक्या अनिश्चिततेत आणि निसरड्या रस्त्यांवरून प्रत्यही भेलकांडणाऱ्या वर्तमानाचा तोल सावरत कोलाहलातून वाहत राहण्याची कसरत करावी लागते. या कसरतीत तू हताश होतोस, अगतिक होतोस, संतापतोस. पण तरीही कवितेच्या दांड्यावरचा हात मात्र सुटू देत नाहीस. तुझ्या कवितेत मी या शहराचे असंख्य आवाज ऐकतो. त्यातली उदासी, तुच्छता, माशासारखी तडफड, विद्रोह आणि चिरडल्या जाणाऱ्या आत्म्याच्या वेदना ऐकतो. बापाच्या हाडांतून वेदनेचं कापड सरकता पाहणारा मुलगा, रिकाम्या पाकिटाने मटनाच्या दुकानासमोर उभा राहणारा नवरा आणि रविवारीच मुलीला बापपण देऊ शकणारा पिता अशी तिरफाळलेली रूपं बघताना कवीच्या कंठात पाझरणारा निरर्थकतेचा द्रव माझ्याही आत पसरत जातो. तुझी कविता वाचताना मला, ‘या महानगराच्या वळचणीला बसून कोणता लिहू मी महाशब्द’, असं विचारणारा कवी विवेक मोहन राजापुरे आठवला. तुझा हा भोगवटा पाहायला आणि त्यातला आकांत ऐकायला या शहरापाशी वेळ नाही. ते कोणापाशीही थबकणार नाही. याची नग्न जाणीव तुझ्या कवितेतल्या शब्दांतून पाझरते. म्हणूनच तुझा संताप संताप होतो आणि तू म्हणतोस, कागदच कागद आहेत/ पेनंच पेनं आहेत/ वेळच वेळ आहे/ तरीसुद्धा मी कविता लिहिणार नाही….
पण कितीही पराकोटीचा संताप झाला तरी तूच म्हटल्याप्रमाणे, तू हातात सुरा घेणार नाहीस. तू कविता लिहिशील. कविताच लिहीत राहशील. या विशाल निरर्थकतेचा अर्थ शोधत तू राहशील. हा शाप आहे की उ:शाप, मला ठाऊक नाही. मात्र, त्यासाठी तुला बळ मिळो अशी प्रार्थना मी जरूर करीन.
– जयंत पवार

Additional information

लेखक

गणेश वसईकर

पृष्ठसंख्या

88

बांधणी

पेपरबॅक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मधल्या मध्ये । गणेश वसईकर”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com
× WhatsApp Us